थर्टीफर्स्ट साठी दहा मिनी ट्रक बकरी, 30 हजार कोंबड्या, चार टन सागरी मासे व सहा टन गोड्यापाण्यातील मासे आणण्याची तयारी मटण, मासे विक्रेत्यांनी केली आहे.खाटीक समाजातील नागरिक गेली आठ दिवस बकर्यांचा शोध घेत आहेत. यावर्षी शनिवारी थर्टीफर्स्ट आहे. या दिवशी उपवास असल्याने रविवारीच नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी दुकाने सज्ज ठेवली आहेत. यावर्षी मटण किंवा चिकनच्या दरात वाढ होणार नाही, त्यामुळे सध्याच्या दरातच ग्राहकांना मटण विकत मिळणार आहे.
कोल्हापूर शहर आणि परिसरात मटणाची सुमारे 150 दुकाने आहेत, तर चिकनची 250 दुकाने आहेत. दोन वर्षांनंतर यंदा थर्टीफर्स्ट साजरा होत आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी गेली चार दिवस कुटुंबासह मित्र मंडळींच्या वतीने नियोजन केले आहे. काहीजणांनी हॉटेल बुक केली आहेत. तर काहींनी शेतातील हॉटेल्सना जाण्याची तयारी केली आहे. शनिवारी थर्टीफर्स्ट उपवासामुळे कुटुंबातील काहीजणांना मांसाहार वर्ज्य करावे लागणार आहे.
त्यामुळे काही कुटुंबांनी रविवारीच नववर्षाच्या स्वागताला मांसाहार करण्याचा निर्णय घेतला आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मटण, चिकन आणि मासे विक्रीत वाढ होणार आहे. त्यामुळे मटण विक्रेत्यांची बकरी खरेदीसाठी धांदल उडाली आहे. कराड, जत, मिरज, चाकण, वडगाव, ढालगाव याशिवाय कर्नाटकातील काही गावांमध्ये बकरी बाजार भरतो. तेथून बकरी आणली आहेत. चिकन स्वस्त असल्यामुळे अनेकांचा ओढा चिकन खरेदीकडे आहे.
बांगडा, सुरमईला विशेष मागणी
मासे विक्रेत्यांनी रत्नागिरी, गोवा, मुंबई, मालवण, देवगड या भागातून माशांची खरेदी केली आहे. थर्टीफर्स्टसाठी बांगडा, सुरमई या माशांना मागणी आहे. सुमारे चार टन मासे आवक होतील, असे विक्रेत्याकडून सांगण्यात आले.