राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ही छापेमारी सुरु असून मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडी कडून छापेमारी करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून ही छापेमारी सुरु असून जवळपास 20 अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोचले आहेत. या एकूण सर्व प्रकरणामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या घरी ईडीची छापा टाकला होता.त्यातच आता दिग्गज नेते हसन मुश्रीफ ईडी आणि इन्कम टॅक्सच्या रडारावर असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, याप्रकरणी आपण लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.