अपघातातील हेरलेच्या जखमी युवकाचा मंगळवारी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अक्षय प्रताप लोखंडे वय २७, रा. हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे गुरुवारी दिनांक ५ रात्री अज्ञात मोटारीने अक्षयला फरफट नेले होते. जखमी अक्षयवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय हा सांगली फाटा येथील एका हॉटेल मध्ये मित्रा सोबत जेवानासाठी गेला होता. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींशी अक्षयचा वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत होण्यापूर्वी ते अनोळखी व्यक्ती आपली चारचाकी मोटार घेऊन निघाले. सदरची मोटार ही कर्नाटक पासिंगची होती. मोटार सुरू झाल्यानंतर अक्षयची अनोळखी व्यक्तीशी झटापट सुरू होती. यामध्ये अक्षयचे कपडे मोटारीत अडकल्याने तो मोटारीसोबत फरफटत गेला. यामध्ये अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना घडून चार दिवस झाले. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलिसांकडून कारवाईचं आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा अक्षयच्या नातेवाईकांनी घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. अक्षय लोखंडे हा अविवाहित होता. तो डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ मध्ये कार्यरत होता. तो घरातील एकुलता एक कमवता असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी
त्याच्यावर होती.