Saturday, April 13, 2024
Homeकोल्हापूरअकरावीच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ!

अकरावीच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ!कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेत गुणांची मोठ्या प्रमाणात खैरात झाली. तरीदेखील शहरातील 11 वीच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे घसघशीत गुण मिळविणारे विद्यार्थी गेले कुठे? असे म्हणण्याची वेळ शिक्षण संस्थांवर आली आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने शहरातील 34 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 14 हजार 600 जागांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसर्‍या फेरी अलॉट केलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी शनिवारी सहायक शिक्षण संंचालक सुभाष चौगुले यांनी जाहीर केली. दुसर्‍या फेरीत 5 हजार 278 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले आहेत. मात्र, अद्याप 4 हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. राजाराम कॉलेज व न्यू कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा अनुदानितचा कट ऑफ वाढला आहे. इतर ठिकाणी 1 टक्क्यांनी घटला आहे. वाणिज्य इंग्रजी शाखेसाठी अर्ज केलेल्या खुल्या प्रवर्गातील 70 विद्यार्थ्यांना इतर राखीव प्रवर्गातून प्रवेश दिले आहेत. कला शाखेतील मराठी माध्यमाची प्रवेश क्षमता 2737 असून 2258 जागा शिल्लक आहेत. वाणिज्य मराठी शाखेची प्रवेश क्षमता 2381 असून 1501 जागा रिक्त आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना परवागी पाठवणे, प्रवास व राहण्याची सुविधा याच्या धास्तीने पालकांनी भौगोलिकद़ृष्ट्या जवळ असणार्‍या महाविद्यालयात शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील 25 टक्के विद्यार्थ्यांचा शहराकडील ओढा यावर्षी कमी झाला आहे. रिक्त जागांची आकडेवारी पाहता अनुदानित, विनाअनुदानित तुकड्यांना घरघर लागणार काय? अशी परिस्थिती आहे. दुसर्‍या फेरीत अलॉट केलेल्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास आणखी जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 25 ते 28 सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. शासन निर्णयानुसार 4 ऑक्टोबरपासून 11वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत.

विज्ञान शाखेसाठी कट ऑफ पॉईंट वाढला
दुसर्‍या प्रवेश फेरीअखेर विज्ञान शाखेसाठी जास्त मागणी असलेल्या महाविद्यालयांचा 1 ते 2 टक्केंनी कट ऑफ पॉईंट वाढला आहे. इतर महाविद्यालयांत 1 टक्क्यांनी घसरला आहे. वाणिज्य इंग्रजी शाखेसाठी कॉमर्स कॉलेजमध्ये खुल्या प्रवर्गातील 17, विवेकानंद कॉलेजमध्ये 45 व डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये 70 खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातून प्रवेश दिले आहेत. वाणिज्य मराठी शाखेत मागणी असलेल्या कॉलेजच्या कट ऑफ पाईंटमध्ये 2 टक्केंनी वाढ तर इतर कॉलेजमध्ये 13 ते 23 टक्केंनी घट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -