कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशीमधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत.
पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते आज स्वतःहून मुंबई येथील ईडी कार्यालयात दाखल झाले. मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समाज बजावून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पी. एन. पाटील यांना यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते.
त्यामुळे आज कार्यालयात येऊनही त्यांची चौकशी होऊ शकली नाही. त्यांना आता आठवडाभरात नव्याने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आता आणखी एका मोठ्या नेत्याची चौकशी या अनुषंगाने होत आहे. यापूर्वी मुश्रीफ अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना आज (5 एप्रिल) न्यायालयातून दिलासा मिळतो की नाही? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी पूर्ण झाली असून विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की नाही? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.