पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला गुन्हे शाखा पोलिसांनी कोल्हापूर मधून अटक केली आहे. बिरप्पा शेजाळ (४१) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीच्या हत्येनंतर तो कोल्हापूरला गेला असता त्याच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कामोठे येथे विवाहितेचा मृतदेह आढळला होता. घटनेनंतर तिचा पती बेपत्ता असल्याने पतीने हत्या केल्याचा संशय बळावला होता. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. या पथकाने पती बिरप्पा शेजाळ (४१) याचा सुगावा घेतला असता तो कोल्हापूर मधील गावी असल्याचे समजले.
घटनेच्या दिवसांपासून त्याने फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पथकाला अनेक प्रयत्न करावे लागले. अखेर कोल्हापूर मधून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी सोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डोक्यात हातोडी मारून तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे.