कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी आता ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार आहे. गट क्रमांक ५ मध्ये १ व अनुसूचित जाती जमाती गटामध्ये १ असे दोन उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. दरम्यान, आज, गुरुवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.
‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या पंधरा दिवसांच्या मुदतीत एकूण १०६ जणांनी माघार घेतली. बुधवारी माघार घेण्याचा अखेरचा दिवस होता. हातकणंगले, करवीर, पन्हाळा ,राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या राजाराम कारखान्याचे १३ हजार ५३८ सभासद आहेत. त्यामध्ये १२९ ”ब” वर्ग सभासदांचा समावेश आहे.
गट क्रमांक पाच व अनुसूचित जाती जमाती गटवगळता सर्व गटांत दुरंगी लढत होणार आहे. राजारामसाठी २३ एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून २५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे काम पाहत आहेत.
दरम्यान, दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला आता अधिकच रंगत येणार आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी गटाचे नेते माजी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे. येत्या आठ दिवसांत दोन्ही गटांच्या जाहीर सभा ही मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या सभामध्ये एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी धडाडणार आहेत.