खानापूर पैकी रायवाडा (ता.आजरा) येथील दरोडा प्रकरणी आजरा पोलिसांनी रवी नाईक ( रा.रुक्मिणीनगर बेळगाव) या मुख्य संशयितासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी तीन पिकअप टेम्पोसह पळवून नेलेली ७१ डुकरे जप्त केली आहेत. २४ तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
दरोड्यानंतर पोलिसांनी आजरा, दड्डी व बेळगाव येथील सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तपास सुरू केला होता. काल सायंकाळी दरोड्यातील मुख्य आरोपी रवी नाईक याला रुक्मिणीनगर बेळगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या जंगलात डुकरे लपविल्याचे त्याने कबुल केले. तर त्याला मदत करणारे अन्य संशयितांचीही नावे सांगितल्यामुळे संपूर्ण दरोडा प्रकरणच उघडकीस आले आहे.
पोलिसांनी पहिल्या टप्प्यात तीन पिकअप टेम्पोसह चोरीस गेलेल्या २२० पैकी ७१ डुकरे ताब्यात घेतली आहेत.व आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अद्यापही सोने-चांदी, काजूगर व काजू बियांचाही तपास सुरु आहे. या दरोड्यांमध्ये आणखीन काही संशयितांचा सहभाग असल्याने त्यांचीही पोलिसांकडून धरपकड सुरूच आहे .