सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे, पाटील आहे. बंटी पाटील हा कोल्हापूरला लागलेला शाप आहे, शेतकऱ्यांसाठी तर कर्दनकाळ आहे, अशी जहरी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या प्रचार शुभारंभात केली. या मेळाव्यातून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांनीही सतेज पाटलांवर हल्लाबोल केला. धनंजय महाडिक यांनी अत्यंत शेलक्या शब्दामध्ये सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राजारामच्या निवडणुकीत इतकं लीड द्या की, बंटी पाटील यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची तलप नाही आली पाहिजे, ही केवळ राजाराम कारखान्याची निवडणूक नाही तर जिल्ह्यातून दृष्य प्रवृत्ती नष्ट करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. धनंजय महाडिक म्हणाले की, बंटी पाटील यांचा एक टन ऊस कारखान्याला जात नाही. सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे, पाटील आहे. सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे, खोटारडा माणूस आहे. सूडबुद्धीने काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे. सतेज पाटील तुमचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत होतील.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले की, अंगठी वाटणार म्हणतात, पण खऱ्या वाटतात की खोट्या वाटतात तपासून घ्या. बावड्यातील 90 टक्के शेतकरी आमच्यासोबत असल्याचे 23 तारखेला समजेल. यांचे सगळं घरदार प्रचार करत आहे आणि आम्हाला म्हणतात सर्व महाडिक घराबाहेर पडलेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं यांचं चाललं आहे. राजाराम कारखाना सगळ्यात कमी खर्च करणारा कारखाना आहे.
धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील कोल्हापूरला लागलेला शाप आणि शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ असल्याची जहरी टीका केली. ते म्हणाले की, यांचं सगळं टक्केवारीवर चाललं आहे, कुठं आहे थेट पाईपलाईनचा कंत्राटदार? 29 उमेदवार अपात्र झाले, तर काळा दिवस आणि तुम्ही 1800 सभासद रद्द करायला निघाले होता तो सुवर्णकाळ होता का? अशीही विचारणा त्यांनी केली.
अमल महाडिक म्हणाले की, महाडिक साहेबांनी 27 वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला आहे. कारखान्याचा 7/12 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना नावाने आहे. बंटी पाटील कुणाचं काही तरी ऐकून तोंडावर पडू नका. आम्ही 37 वर्षाचे अहवाल तुम्हाला दाखवतो तुम्ही एक वर्षाचे दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची आणि खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे. सतेज पाटील पहिल्यांदा तुम्हाला आमदार केलं ते महादेवराव महाडिकांनी केलं. विधानपरिषदेला मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला.
अमल महाडिक पुढे म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही, आणि बावड्यात येऊन फिरणारच. सतेज पाटील लिमिटमध्ये रहा आणि लिमिटबद्दल बोला. आम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांवर बोलत नाही. मात्र, तुम्ही महादेवराव महाडिक यांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ. बिंदू चौकात 7 वाजता येतो, तुम्ही देखील या. तुमच्या सोबत बोलणारे लोक तुमचे घात करणार आहेत. निवडणूक लागली की तुम्ही सभासदांच्या घरी जात असता, आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. आमच्या सभासदांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.