सोनाळी येथील सात वर्षीय वरद रवींद्र पाटील याचा सावर्डे येथे नरबळी दिल्याच्या वृत्ताने शुक्रवारी सर्वत्र खळबळ उडाली. नरबळीच्या संशयाने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह पोलिस कर्मचार्यांची चांगलीच दमछाक झाली. तर, सोनाळी गावात दिवसभर तणावाचे व संतापजनक वातावरण होते.
सोनाळीच्या मित्रानेच मित्राच्या मुलाचा घात केला. ‘त्या’ नराधमाने आपल्याला बारा वर्षांपासून अपत्यप्राप्ती होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचा वरदचा नरबळी दिल्याची सोशल मीडियावरील (social media) चर्चा शुक्रवारी सकाळपासून सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली.
जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट सावर्डे येथे घटनास्थळी समक्ष भेट दिली व तपास यंत्रणेला मार्गदर्शन केले. तर, मुरगूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे हे फौजफाट्यासह सोनाळी व सावर्डे गावात बंदोबस्त हाताळत होते.
मृत वरद पाटील याच्या आई-वडिलासह त्याचे आजोबा व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. ‘माझा मुलगा कोठे गेला? त्याला शोधून आणा,’ असे म्हणून वरदचे वडील रवींद्र पाटील आक्रोश करीत होते. त्यांच्या सांत्वनासाठी ग्रामस्थांची रीघ लागली होती. गावातील सर्व व्यवहार दिवसभर बंद होते.
आरोपीच्या घरासमोर संतप्त ग्रामस्थांचा मोठा जमाव जमा झाला होता; पण पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. मोठ्या फौजफाट्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.
कु. वरदच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
मुलाच्या खुनाची सखोल चौकशी करा ः अंनिस
वरद पाटील या शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणाची पोलिस यंत्रणेने सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णांत स्वाती, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिंदे, प्रधान सचिव हर्षल जाधव, शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) पद्मा कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.