सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी आज सायंकाळी उन्हाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिटे पाऊस पडला आणि त्यामुळे तापलेल्या वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. दुपारपासून ऊन- सावलीचा खेळ सुरु होता.
चारपासून ढग जमा होताना दिसत होते. उकाडा वाढला होता. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पावसाचे टपोरे थेंब सुरु झाले आणि पुढे पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. मिरजेत तुरळक प्रमाणात सरी कोसळल्या. विटा, खानापूर, भिवघाट परिसरात दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वीस मिनिटे पडलेल्या हलक्या सरीने विट्यात डांबरी रस्त्यावरुन पाणी वाहत होते. सकाळपासून उन्हाचे असह्य चटके बसत होते. अचानक दुपारी हवेत बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. या पावसाने मात्र तात्पुरता वातावरणात गारवा निर्माण झाला.
अंकलखोप परिसरात विजासह जोरदार पावसाची हजेरी लावली. मिरज पश्चिम भागात तुंगसह ठिकठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी वातावरणात दाह कमी होऊ गारवा निर्माण झाल्याने लोक बाहेर पडले. सायंकाळनंतर बाजारात थोडी गर्दी दिसू लागली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. मिरज मार्केटमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत होते.