Thursday, April 25, 2024
Homenewsपाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप; 61 कोटी 50...

पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप; 61 कोटी 50 लाखांचा आराखडा


ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11व्या शतकातील असल्याचं अभ्यासक मनात असले, तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे पंढरपुरातील मंदिर अस्तित्वात असल्याचं काही अभ्यासकांचे मत आहे .


आता पुन्हा 700 वर्षांपूर्वीचे(700 years ago) मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून याचा आराखडा बनविण्याचे काम केलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे सोपवला होता. मंदिर समितीनं नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे. या आराखड्यानुसार, विठुरायाच्या मंदिराचं काम पाच टप्प्यात केलं जाणार आहे. यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथं दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मंदिराचं आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे.


तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीनं बांधलेलं नामदेव महाद्वाराचं आरसीसी काम पाडून तिथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविलं जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्कायवॉक बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीनं अग्निशमन यंत्रणा, वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचं काम केलं जाणार असल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं आहे.


गेल्या दीड वर्षांपासून मंदिर बंद असल्यानं भाविकांकडून येणारं उत्पन्न बंद झाल्यानं 60 कोटींचा आर्थिक फटका मंदिराला बसला आहे. आता या कामासाठी राज्यभरातील देणगीदारांना आवाहन केलं जाणार असून राज्य सरकारकडेही आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या महापूजेसाठी पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराचा विकास आराखडा आणि इतर प्रश्नांसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे येत्या पाच वर्षात जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांना 700 वर्षांपूर्वीचे म्हणजेच, संत कालीन विठ्ठल मंदिर लवकरच पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -