मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. असे अनेक लघुग्रह पृथ्वी जवळून पुढे जात असतात. शनिवारी तब्बल 4500 फूट व्यासाचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून गेला.
ताशी 94000 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने गेलेल्या या लघुग्रहाचे नाव ‘2016 एजे 193’ असे आहे. दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’ किंवा न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही हा लघुग्रह मोठ्या आकाराचा आहे.
या लघुग्रहाचा शोध 2016 मध्ये लावण्यात आला होता. त्यावेळेपासूनच तो पृथ्वीच्या दिशेने येत होता व संशोधक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.40 च्या दरम्यान हा लघुग्रह पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर होता.
अर्थात त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या अंतराच्या नऊ पट अधिक होते! आता 42 वर्षांनी म्हणजेच 22 फेब्रुवारी 2063 मध्ये तो पुन्हा पृथ्वीजवळून जाईल.
25 जुलैलाही ‘2008 जीओ20’ नावाचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून गेला होता. त्यावेळी त्याचा वेग ताशी 29 हजार किलोमीटर(kilometre) इतका होता. या लघुग्रहांपासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.