शहापूर मलाबादे चौक ते शहापूर नाका तारदाळ या मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूस कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क तसेच अन्य सायझिंग व कारखाने आहेत. यातून येणारे दुषित पाणी रस्त्यावरच साचत आहे. यातून नागरिकांना ये- जा करावी लागत आहे. रहदारीदरम्यान उडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मात्र संबंधित कारखानदार व लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही. कोरोची- तारदाळ रोडवर जी. के. नगरलगत टेक्स्टाईल पार्क असून या परिसरात अनेक सायझिंग कारखानदार आहे. यातून येणारे सर्व दुषित पाणी एकत्रित रस्त्यावर येवून साचत आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड दलदल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
याच परिसरात जनावरेही वावरताना दिसतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रामनगर परिसरातील नागरिकांना कारखान्यातून येणाऱ्या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये- जा करावी लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील कारखानदारांनी या दुषित पाण्याचा निचरा करावा अन्यथा या भागातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, असे विनोद कोराणे यांनी सांगितले.