इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक जागेची तात्काळ मोजणी करून त्या संदर्भातील अहवाल सादर करावा, असा आदेश | जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाटबंधारे खात्यास शुक्रवारी दिला. या संदर्भात नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
सुळकुड पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांना भेटले. यावेळी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी या प्रश्नी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
इचलकरंजी शहरासाठी महत्वपूर्ण असलेली सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी शिघ्र गतीने प्रयत्न करण्याच्या सूचना रेखावार यांना दिल्या. या संदर्भात लवकरच सर्वांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी सांगितले, इचलकरंजी शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी महाराष्ट्र शासनाने
सुळकूड उद्भव धरुन दुधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.
परंतु या योजनेसाठी आवशक असलेली जागा अद्याप मिळालेली नाही. शिवाय योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची जुनी कागदपत्रे आणि उतारे उपलब्ध होत नसल्यामुळे महत्वाकांक्षी योजनेचे पूर्ण काम थांबले आहे. या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी सदर जागेची मोजणी करणे हा एक महत्वाचा पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर सदर जागेची मोजणी करून ती ताब्यात घ्यावी आणि योजना कामाला गती द्यावी असा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी पाटबंधारे विभाग तसेच संबंधीत खात्यांना दिले आहेत. सुळकूड योजनेसाठी लागणाऱ्या जागेच्या मोजणीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ही योजना गतीने पूर्णत्वास जाईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख रविंद्र माने व शहराध्यक्ष भाऊसो आवळे यांनी व्यक्त केला.