शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांचा महिनाभरातच हा दुसरा कोल्हापूर दौरा आहे. शुक्रवारी (दि. १४) दु.४ वाजता पेटाळा मैदान येथे शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. यावेळी ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे नाते होते. शिवसेनाप्रमुखांनी कोल्हापूर वासीयांवर विशेष प्रेम केले. कोल्हापूरकरांनी अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेच्या उमेदवारांना साथ देवून शिवसेनाप्रमुखांच्या प्रती आपले प्रेम दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात नेहमीच अंबाबाईच्या दर्शनाने करायचे.
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वसा पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री शिंदे यांचेही कोल्हापूरवर व्यक्तिगत लक्ष असून, गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. गेल्या महिन्यातच शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत तपोवन मैदान येथे भव्य सभा पार पडली. त्यानंतर पुन्हा १४ तारखेला ते शिवसैनिकांचा मेळावा घेवून शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास शिवसेनेचे विविध मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचेही या पत्रकात क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
उद्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने उद्या (दि.१२) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.