मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या दोघा युवकांवर तलवारीने हल्ला झाला. वारे वसाहत येथे मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. यात पृथ्वीराज विलास आवळे (वय २३) आणि प्रेम खंडू माने (वय १८, दोघे रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापूर) हे युवक जखमी झाले. आवळे हा सराईत असून त्याची स्थानबद्धतेच्या कारवाईतून नुकतीच सुटका झाली आहे. पोलीस हल्लेखोरांची शोध घेत आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने वारे वसाहत येथे मंगळवारी संयुक्त जयंती समितीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी जोडलेली ध्वनियंत्रणा पाहण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुंड पृथ्वीराज आवळे तिथे गेला होता. त्यावेळी एका युवकाने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आवळे याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. यावेळी झालेल्या झटापटीत प्रेम माने याच्या तळहातावर वार झाला. नागरिकांनी दोन्ही जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
ऋतिक साठे याने आपल्यावर हल्ला केला असे आवळे याने पोलीसांना सांगितले, तर प्रेम माने याच्यावर आवळे याने हल्ला केल्याची माहिती माने याच्या नातेवाईकांनी दिली. हल्लेखोर साठे हा घटनेनंतर पळाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिरवणुकीपूर्वीच हल्ल्याची घटना घडल्याने वारे वसाहत परिसरात तणाव निर्माण झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला. कडेकोट बंदोबस्तात मिरवणूक पार पडली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी हे घटनास्थळी पोहोचले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.