कॉलेजच्या नावाखाली अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करणाऱ्या चार जोडप्यांवर कोल्हापुरात (Kolhapur News) निर्भया पथकाने छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. कोल्हापूर शहरात अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेवर निर्भया पथकाने छापे टाकून ही कारवाई केली. यावेळी कॅफेमध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या चार जोडप्यांना निर्भया पथकाने ताब्यात घेतले आहे. कॅफेमध्ये अश्लील कृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली.
निर्भया पथकाकडून छापेमारी केल्यानंतर कॉलेजच्या नावाखाली बाहेर येऊन अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे सुरु असल्याचे दिसून आले. पथकाने मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे छापेमारी केली. छापेमारीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात आम्ही निर्भया पथकाच्या माध्यमातून कॅफेची पाहणी केली. काही कॅफेमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काही कॅफेंवर आम्ही छापेमारी केली. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणी काही अनुचित प्रकार करताना मिळून आले. आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई भविष्यात सुद्धा आम्ही सुरुच ठेवणार आहोत. जे चुकीचे प्रकार कोल्हापुरात सुरु आहेत त्यावर 100 टक्के निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळणारे तरुण, बसस्टॉप, शाळेच्या मार्गांवर थांबणारी तरुणांची टोळकी, भरधाव वेगाने जाणारे दुचाकीस्वार, बसस्टॉपवर गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाया करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी निर्भया पथकांना दिल्या आहेत. त्यांनी शाळा, कॉलेजच्या वेळेत गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जयश्री देसाई यांनी यापूर्वी महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज आणि कॉमर्स कॉलेजच्या आवारात जाऊन विनाकारण घुटमळणाऱ्या तरुणांना समज दिली आहे. पोलिस आल्याचे पाहून अनेक तरुणांनी पळ काढला. हुल्लडबाज तरुणांबद्दल निर्भयपणे तक्रारी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी काही महाविद्यालयातील प्रशासनाशी चर्चा करून विद्यार्थिनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेटीतील तक्रारींची वेळीच दखल घेण्याच्या सूचना दिल्या.