सध्या देशात महागाई (Inflation) दरदिवशी नवनवीन विक्रम नोंदवत आहे. महागाईने सर्वसामान्यांची कंबर तोडली आहे. यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत ओरड होती. गेल्या वर्षभरात टोमॅटो, भाजीपालाच नाही तर दूध, पॅकिंग फुड, डाळी (Pulses Price) , पॅकिंग पीठ, तांदळाच्या किंमती (Rice Price) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यातच निसर्गाने फटका दिल्याने अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली तर काही ठिकाणी शेती वाहून गेल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काही काळात नागरिकांना दैनंदिन वस्तू खरेदीसाठी पण कर्ज काढावे लागते की काय, अशी चर्चा रंगली आहे.
अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने या आठवड्यात आकडेवारी संसदेसमोर मांडली. तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ठेवत आहे. पण गेल्यावर्षीपासून किंमती सूसाट आहे. त्यातच निसर्गचा फटका बसल्याने तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता.
गेल्या एका वर्षात तूर डाळीने किंमतीत आघाडी घेतली. डाळीच्या किंमतीत 28 टक्क्यांची वाढ दिसून आली. उडदाची डाळ आणि पीठाच्या किंमतीत वर्षभरात 8 टक्क्यांची दरवाढ दिसून आली.
मंत्रालयाने तूर डाळीच्या किंमती वाढण्यामागे उत्पादन घटण्याचे कारण पुढे केले. 2022-23 या वर्षात कृषी मंत्रालयाने तिसऱ्यांदा उत्पादनाचा आकडा अंदाज वर्तवला. हा अंदाज सातत्याने घसरत आहे. 42.2 लाख टनाहून हा आकडा थेट 34.3 लाख टनावर आला आहे.
भाजीपाल्याची दरवाढीचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका सदस्यानुसार, भाजीपाला जास्त दिवस टिकत नाही. तो खराब होतो. पावसामुळे अगोदरच भाजीपाला लवकर खराब होत आहे. त्यात किंमती वाढल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना पण बसत आहे.
ग्राहक मंत्रालयाने डाळी, भाजीपाल्याच्या भावाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गुरुवारी तूर डाळची किरकोळ बाजारातील सरासरी किंमत 136 रुपये किलो आहे. गेल्यावर्षी हा भाव 106.5 रुपये प्रति किलो होता. उडदाची डाळ गेल्या वर्षी 106.5 रुपये किलो होती. यंदा हा भाव 114 रुपये प्रति किलोवर पोहचला.