गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील अण्णा रामगोंडा शाळेसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमधील चार दुकानांना भीषण आग लागली. या आगीत भाजीपाला व अन्य साहित्य मिळून सुमारे ५ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गोकुळ चौक परिसरात असलेल्या आण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोर महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट आहे. याठिकाणी बजरंग उध्दव डोईफोडे, पांडुरंग व्यंकटराव बुधारपुर, अशोक शिवरुद्र गदरे व संतोष चंद्रकांत शिंदे यांचे भाजीपाल्याचे स्टॉल्स आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या मार्केटमधील डोईफोडे यांच्या दुकानास अचानकपणे कशाने तरी आग लागली. मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य साहित्य बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व आगीने रौद्ररुप घेतले. या आगीची घटना तेथीलच अन्य एका दुकानदाराच्या नजरेस आली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत डोइफोडे यांच्या दुकानातील सीसीटिव्ही, तीन वजनकाटे, कॅशकाऊंटर, फॅन, इनव्हर्टर व भाजीपाला, बुधारपुर यांच्या दुकानातील कॅशकाऊंटर, फॅन, इनव्हर्टर, गदरे यांच्या दुकानातील ४ वजनकाटे, कॅश काऊंटर, फॅन, रोख रक्कम व भाजीपाला तर शिंदे यांच्या दुकानातील सीसीटिव्ही, वजनकाटा, कॅशकाऊंटर, फॅन, इनव्हर्टर, भाजी असे ५ लाख ९० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.