अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने देशभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या सहाव्या-सातव्या दिवशीही काही थिएटर्स हाऊसफुल होत आहेत. मात्र याचदरम्यान पाटणाच्या एका थिएटरबाहेर बॉम्ब फुटल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. बिहारच्या पाटणामधील एका थिएटरबाहेर बॉम्ब फुटल्याची माहिती समोर येत आहेत. सुदैवाने यात कोणतंही नुकसान झालं नाही. थिएटरबाहेर कमी तीव्रतेचे दोन बॉम्ब आढळले आणि त्यापैकी एक बॉम्ब फुटला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
याआधी कानपूरच्या एका थिएटरमध्ये ‘गदर 2’ची स्क्रिनिंग सुरू असताना गोंधळ निर्माण झाला होता. ‘गदर 2’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बाऊन्सर्सनी मारहाण केली होती. यानंतर थिएटरमध्ये बराच गोंधळ झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. थिएटरमध्ये एसी चालू नव्हता म्हणून काही लोक त्याची तक्रार करण्यासाठी आयोजकांकडे गेले होते. तिथे दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर बाऊन्सर्सनी लोकांना मारहाण केली.
‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांनी भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाच्या या यशाचं श्रेय सनी देओलने त्यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीला दिलं आहे. विशेष म्हणजे या खास व्यक्तीचा नुकताच देओल कुटुंबात समावेश झाला आहे. ‘गदर 2’ला मिळणारं हे यश म्हणजे सून द्रिशा आचार्यचा पायगुण आहे, असं सनी देओल मानतो. मुलगा करण देओलची पत्नी द्रिशा ही ‘गृहलक्ष्मी’ असल्याचं त्याने म्हटलंय. देओल कुटुंबात द्रिशा येताच अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या येण्यानेच ही समृद्धी आणि यश मिळाल्याचं सनी देओल मानत आहे.