देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की G20 म्हणजे नेमकं काय आहे?
तर G20 हा 20 देशांचा समूह आहे. या देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन जगातील आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करतात. G20 देशांचा जागतिक आर्थिक उत्पादनात 85 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.
युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे G-20 मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. हे व्यासपीठ जगाच्या बदलत्या परिस्थितीचाही विचार करते आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करते. हा यामागचा महत्वाचा उद्देश आहे.
G20 मध्ये कोणत्या देशांचा समावेश?
भारत, चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे.