रेल्वेत नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याला आज दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निखिल चंद्रशेखर घोरपडे (वय २६, रा. हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. पळसापुरे यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.करवीर पोलिसांनी सांगितले की, मुंबईत रेल्वे विभागात माझी ओळख आहे. तुमच्या मुलास नोकरी लावतो असे आमिष दाखवून मनोहर पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. आरोपी निखिल घोरपडे हा पाचगांव येथील पोवार कॉलनीत २०१९ मध्ये पत्नीसह भाड्याने राहात होता. तेथे तो आपण पत्रकार असल्याचे सांगून मुंबई रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचे सांगत होता. तसेच मुलाला नोकरी लावण्यासाठी साडेपाच लाख रुपये लागणार असे सांगितले होते. पाटील यांच्या मुलास नोकरी लावण्यासाठी त्यांनी रोख, धनादेश आणि फोन पेद्वारे साडेपाच लाख रुपये दिले. मात्र, नोकरी लावली नाही. तसेच पैसे परत दिले नाहीत. त्यानंतर निखिल पळून गेला. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ जून २०२१ ला करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.