जादा दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून अविकाज सेक्युअर इन्व्हेस्टमेंट आणि अविका एंटरप्राईज कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत राहुल शामराव पुजारी (रा. धनगर गल्ली, हातकणंगले) याने संचालक विजय ऊर्फ पिरगोंडा पाटील आणि संदीप कारंडे (दोघे रा. हातकणंगले) यांच्याविरोधात ५० लाखांचा गंडा घातल्याची तक्रार हातकणंगले पोलिसांत दिली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशा तक्रारी कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्याच्या विविध भागांत दाखल झाल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, विजय ऊर्फ पिरगोंडा नरसगोंडा पाटील याने शेअर मार्केट आणि गोल्ड कॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यासाठी अविकाज इन्व्हेस्ट आणि एंटरप्राईज या कंपन्या सुरु केल्या. त्याचे मामा संदीप सिद्धेश्वर कारंडे माजी सरपंच आणि उद्योजक असल्याने त्यांच्या सांगण्यावरून कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे राहुल पुजारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आरटीजीएसद्वारे २५ जानेवारी २२ ते ३ डिसेंबर २२ कालावधीत ३२ लाख कंपनीच्या नावे पाठवले. तसेच संदीप कारंडे यांच्या नावे दीड लाख रुपये पाठवले आहेत. कारंडे यांच्या सळी कारखान्यात रोखीने रक्कम दिली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले असून, गुंतवलेल्या पैशावर ८ ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ५० लाखांचा गंडा घातल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी विजय पाटील आणि संदीप कारंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विजय पाटील आणि त्यांच्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध ८६ गुंतवणूकदारांनी जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूरसह इतर पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्याने फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. विजय पाटील याने हातकणंगले आणि जयसिंगपूर परिसरातील चार-पाच चारचाकी वाहने कंपनीच्या नावे भाडेकरारावर घेतली आहेत. या चारचाकी धुळे, कोपरगाव परिसरातून दारूबंदी असलेल्या गुजरात राज्य आणि अन्य ठिकाणी चोरटी दारू वाहतूक करत असल्याची शक्यता गाडीमालकांनी व्यक्त करून पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.