ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामिण भागातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील काही गावामध्ये राज्य सरकारचा निषेध करण्यात येऊन सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. जर सरकारने मनोज जरांगे – पाटील यांनी मांडलेल्या मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर मराठा आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशाराही मराठा आंदोलकांकडून राज्य सरकारला देण्यात आला.
कसबे डिग्रजमध्ये आरक्षणासाठी मशाल फेरी, तिरडी मोर्चा
कसबे डिग्रजमध्ये शिवप्रतिष्ठान कार्यालयासमोर साखळी
उपोषण सुरू आहे. आंदोनकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भुमिका घेतली. रविवारी युवक, युवती यांच्यासह महिलांनी उस्फुर्त सहभागी होऊन हजारोंच्या संख्येने गावातील मुख्य मार्गावरून मशाल फेरी काढली. गावात येणाऱ्या एसटी बसेस वरील शासकीय जाहिरातीतील मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंला काळे फासण्यात आले सायंकाळी गावात तिरडी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सांगली- इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरती टायर पेटवून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, जोपर्यंत सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला.
मणेराजूरीत मराठा समाजाचा उद्रेक ! नेत्यांच्या फोटोला फासले काळे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज महावीर चक्र विजेते पांडूरंग साळुंखे पुतळ्याजवळ साखळी उपोषणाला बसले. मराठा समाजाने सरकारविरोधी घोषणा देऊन निषेध
केला. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने गांवातील सर्व शेती सेवा केंद्रासमोर असणाऱ्या नेत्यांच्या फोटोला काळे फासले. तर बसस्थानक चौकातून जाणाऱ्या एसटी बसवरील नेत्यांच्या फोटोलाही काळे फासून शासनाचा निषेध केला. या साखळी उपोषणास मुस्लीम समाजासह अनेक घटकांनी पाठींबा दिला.
तासगाव तालुक्यातील कुमठे येथे श्रीकृष्ण विकास सोसायटी समोर साखळी उपोषणास सुरुवात केली असून जोपर्यंत
हक्काचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज पासून अनेक जण साखळी उपोषणास बसले आहेत. तर काल कुमठे येथील महिलाबंधूभगिनीं, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह मराठा बांधवानी गावातून विराट असा मशाल मोर्चा काढण्यात आला. सरकारने शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने आरक्षण द्यावे. अन्यथा मराठा समाज जर पेटून उठला तर सरकारला सोसणार नाही, असा गर्भित इशारा सकल मराठा बांधव कुमठे यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी सर्व सकल मराठा बांधव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.