येत्या काही दिवसात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच बरोबर अनेक जिल्ह्यात हवामान बदलणार असल्याची माहिती दिली आहे.
8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने रविवारी सांगितले. यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेपासून काहीसा दिलासा मिळू शकेल.
आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9 नोव्हेंबरपर्यंत (गुरुवार) कोरडे हवामान राहील. 7 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. यामुळे या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे.
IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले, काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यात पाऊस पडू शकतो. तथापि, हे सांगणे खूप लवकर आहे आणि आम्ही परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन करीत आहोत.