शहरात महिलांना एकाकी पाहून गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरून पलायन करणार्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कुपवाडमधील भारत सूतगिरणीजवळ अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी सांगितले. त्याच्याकडून चोरीचे सुमारे चार लाखाचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे.
भारत सूतगिरणीजवळ एक तरूण सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावेळी उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी सागर लवटे, सागर टिंगरे यांनी सापळा लावला. यावेळी माधवनगर ते मिरज मार्गावर भारत सूतगिरणीजवळ आलेला उत्तम राजाराम बारड (वय ३० रा. धामोड, ता. राधानगरी) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी त्याच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. या दागिन्याबाबत समाधानकारक माहिती मिळाली नाही.पोलीसांच्या चौकशीमध्ये त्यांचे सांगली शहर व ग्रामीण, तासगाव, शहापूर आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सात ठिकाणी महिलांचे दागिने धूम स्टाईलने लंपास केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख ९४ हजाराचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा साडेचार लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात सांगलीसह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात दागिने लुटण्याचे गुन्हे दाखल आहेत.