दिवाळी सणाला सुरुवात होत असताना कोल्हापूरात काळम्मावाडी पाणी योजनेचे पाणी पोहोचले आहे. तर इचलकरंजीत दसऱ्यापासून कृष्णा नळ पाणी योजनेचे पाणी एक दिवसाआड येऊ लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही महापालिकेतील धगधगत्या पाणी प्रश्नाच्या समस्येवर तुर्त उत्तर मिळाले असल्याने या प्रश्नावरून टीकेचा भडीमार करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांना जल दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरला शुद्ध व मुबलक पिण्याचा पाण्याचा पुरवठा होण्यासाठी चार दशकांपूर्वी काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याचे स्वप्न पाहिले. या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ या महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ४५० कोटी रुपये खर्चाच्या योजनेच्याकामाचे भूमिपूजन २०१४ मध्ये झाले. नंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही प्रमाणात पाठपुरावा केला. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेसमोर आंदोलन केले होते . विविध विभागाचे परवाने मिळण्यात अडथळे येत गेले. काम सुरू असताना तांत्रिक दोष उद्भवले. ग्रामीण भागाचा विरोध होत राहिलाअखेर अभ्यंग्यस्नान
कामाची गती पाहून काळम्मावाडी योजनेच्या पाण्याने दिवाळीची आंघोळ होणार अशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. दिवाळी सरली तरी पाणी काही आले नव्हते. त्यावरून मुश्रीफ व सतेज पाटील यांना टीकेला सामोरे जावे लागत होते. सतेज पाटील यांनी तर काळम्मावाडी योजना पूर्ण झाली नाही तर निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा करून आपले राजकीय भवितव्य टांगणीला लावले होते. अखेर काल या योजनेचे पाणी कोल्हापुरात आल्याने संकल्प कृती झाल्याने पाण्यासाठी झगडणाऱ्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
खरे आव्हान पुढेच
काळम्मावाडी योजनेचे पाणी कोल्हापुरात आल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. तथापि यापुढे शहरात पाणी वितरण व्यवस्था भक्कम असणे गरजेचे आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दोष दिसत आहेत. पाणी शहरात आले असले तरी ते थेट नळापर्यंत पोहोचवणे हे श्रेय घेणाऱ्या नेत्यांसमोर आव्हान असणार आहे.इचलकरंजीची तहान भागली
इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा, कृष्णा,काळम्मावाडी, वारणा (कुंभोज / दानोळी) आणि दूधगंगा असे पाणी योजनेचे अनेक प्रस्ताव आले. पंचगंगा दूषित झाल्याने कृष्णा नदीतून पुरवठा होऊ लागला. कृष्णा योजना गळकी बनल्याने इचलकरंजी सारख्या तीन लाख लोकसंख्येच्या आठवड्यातून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांचा संताप होत असे. अलीकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी गळक्या ठिकाणी पाच किलोमीटरची जलवाहिनी बदलली आहे. दसऱ्यापासून इचलकरंजीकरांना एक दिवसाला पाणी मिळाल्याने तूर्त तरी तहान भागली आहे.दुधगंगेचा भगीरथ कोण ?
तथापि, इचलकरंजीला शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा योजना झाली पाहिजे अशी आग्रही मागणी असून त्यासाठी लोकलढा सुरु आहे. दूधगंगा पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील आजी माजी खासदार, आमदार, दोन्ही कृती समिती यांचे प्रयत्न सुरू आहेत. कागल मधील नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी विरोध केल्याने काम पुढे सरकत नाही. त्यामुळेविरोधाची धार कमी करून दूधगंगा मार्गी लावणे हे दीर्घकालीन आव्हान इचलकरंजीतील नेत्यांसमोर असणार आहे.