इचलकरंजी शहर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धुवाँधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासियांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.
गडगडाटासह सलग पाऊणतास दमदार कोसळलेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर गटारी तुडूंब भरुन सांडपाणी रस्त्यावर आले होते. मुख्य रस्त्यावर फुटपाथ करताना पाणी निचरा होण्यासाठी वाटच न ठेवल्याने सांगली रोडवर तसेच कॉ. मलाबादे चौक ते गांधी पुतळा रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होते. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावारण होते आणि दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाला सुरुवात होऊन त्याने चांगलेच झोडपून काढले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास टिपटिप बसरणाऱ्या पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण शहर आणि परिसराला झोडपून काढले. मुख्य रस्त्यांसह सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर सर्वच भागातील गटारी तुडूंब भरुन वाहू लागल्याने गटारीतील कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावर आले. मंगळवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने विकली मार्केट मधील विक्रेत्यांचीही चांगलीच तारांबळा उडाली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने किरकोळ विक्रेत्यांचे नुकसानही झाले.
सांगली रोडवर महासत्ता चौक ते सहकार नगरपर्यंत तसेच कॉ. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर फुटपाथ करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी काहीच मार्ग न ठेवल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून रहाते. त्याचीच प्रचिती मंगळवारी पुन्हा आली. मुख्य रस्त्यावरच पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्याना चांगलीच कसरत करावी लागत होती. नामदेव भवन – जिम्नॅशियम मैदान ते नाईक्स कॉर्नर, विकली मार्केट ते चांदणी चौक, विकली मार्केट ते टागोर वाचनालय हे रस्ते तर पाण्यातच गेले होते. शिवाय गटारीतील संपूर्ण कचरा रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.