रुई येथील पंचगंगा नदी बंधाऱ्याजवळ जलपर्णी निर्माण होऊ लागली आहे. सदरची जलपर्णी येत्या काही दिवसांतच इचलकरंजी पंचगंगा नदीबंधाऱ्याजवळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या काळात निर्माण होणारी जलपर्णीने आत्तापासूनच तोंड वर काढू लागले आहे. त्यामुळे ही शहरवासियांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. यंदा मुळातच पाऊस कमी झाला आहे. त्यातच नदीपात्रात पाणी कमी आहे. त्यात भरीतभर म्हणून ही जलपर्णी आत्तापासूनच डोके वर काढत आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिका प्रशासनाने यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करणार आहे.
देशातील प्रमुख दुषित नद्यापैकी पंचगंगा नदीचा समावेश आहे. पात्रात मैलायुक्त सांडपाणी, विविध उद्योगातील रसायनयुक्त सांडपाणी अनेक ठिकाणी मिसळते. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दुषीत होवून जलपर्णी वाढीस लागते. त्याचा प्रदुषणाचा ठपका इचलकरंजी महापालिकेवर ठेवला जातो. मात्र, सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीपात्रात कोणतीही जलपर्णी दिसून येत नाही. मात्र रूई बंधाऱ्याजवळ आता नव्याने जलपर्णी निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे कोल्हापूरापासून पंचगंगा नदीत होणारे प्रदुषण याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, प्रदुषण नियंत्रण मंडळ, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कायमच्या ‘पिवळ्या’ नजरेने केवळ इचलकरंजी महानगरपालिकेवरच ठपका ठेवला जातो. पंचगंगा नदी पात्रातील दरवर्षी येणारी जलपर्णी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचारी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काढली जाते. गेल्या वर्षीही पंचगंगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले होते. त्यावेळी तण नाशकांचा वापर करुन जलपर्णी नष्ट करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्याला विरोध झाल्याने जलपर्णी काढण्याची मोहिम थांबवण्यात आली होती. यावेळी मात्र महापालिका प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. रुई येथे बंधाऱ्यात जलपर्णी आली आहे. ही जलपर्णी पुढे वाढत व वाहत इचलकरंजी नदीपात्रात येण्याची शक्यता आहे. याबाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महानगरपालिकेकडून पत्र व्यवहार करण्यात येणार आहे.
रूई बंधाऱ्यामध्ये जलपर्णी निर्माण होऊ लागली आहे. ती जलपर्णी इचलकरंजी पंचगंगा नदीत यायला वेळ लागणार नाही. तेव्हा याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना राबवून नदीपात्र कायमस्वरूपी जलपर्णी मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरवासियांतून होऊ लागली आहे.