उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आज कर्जत शहरात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या आधी अजित पवार यांनी एका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं.
यावेळी अजित पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अजित पवार यांचं 30 जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्यामागचं कारण सांगितलं. “मधल्या काळात काही राजकीय बदल झाले आणि त्याचा उहापोहा झाला. पण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. रायगडचा विकास हा झालाच पाहिजे. इथे समुद्रकिनारा देखील मोठा आहे. या ठिकाणी पर्यटन वाढलं पाहिजे. त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. काही जण विचार करत असतील की ही आम्ही भूमिका का घेतली म्हणून? आम्ही पण राजकारणात काम करत असतो. पण आम्ही काही साधू-संत नाही. आम्ही भूमिका घेतली आहे पण आम्ही विचार काही सोडले नाहीत”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
“आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं, अनेक सरकारमध्ये काम केलं. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकाऱ्यांबरोबर जातात. पण आपली विचारधारा सोडत नाही. मी आपल्या निर्धार सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आपली विचारधारा स्पष्ट आहे. आमचा अल्पसंख्याक समाज असेल, आदिवासी समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, कुठल्याही समाजाने आपापल्या भागात एकोपाने राहावं, युगपुरुष छत्रपती शिवाजी माहाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हीच भूमिका घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच रस्त्याने आमच्या सगळ्यांचा जाण्याचा प्रयत्न आहे”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
‘मी काय लेचापेचा नाही’
“सुधाकर घारे मगाशी काही समस्या बोलले. पण विरोधात राहून काही काम करता येणार का? आपल्याला निधी मिळणार का? पण आपली विचारधारा पक्की ठेवून सत्तेत काम करुन हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो”, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले. “मला मध्ये डेंग्यू झाला आणि मी 15 दिवस नव्हतो. पण मला राजकीय आजार झाला, अशी टीका झाली. पण मी काय लेचापेचा नाही”, असं अजित पवार म्हणाले.
‘कुणी त्याला वेगळं समजण्याचं कारण नाही’
“महाराष्ट्राचं वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतेय. त्यातून वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण या अधिकाराचा वापर करत असताना इतरांना त्रास होणार नाही, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही, समाजा-समाजात अंतर पडणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. कुणी त्याला वेगळं समजण्याचं कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“मराठा समाजाला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजाला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाला वाटतं की, आमच्यामध्ये 350 जाती आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमली आहे. जुन्या नोंदीची तपासणी केली जात आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जातेय. सर्वपक्षीय बैठक घेतली गेली. त्यामध्ये इतरांच्या आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यांना संधी दिली पाहिजे, असं एकमत झालं”, असं अजित पवार यांनी सांगितलं.