इचलकरंजीतील ‘त्या’ बँकेचा परवाना रद्द : बँकिंग क्षेत्रात खळबळ
ताजी बातमी /ऑनलाईन टीम
वस्त्र नगरीत नामवंत बँकेत गणल्या जाणाऱ्या मात्र नियमबाह्य काम, कर्ज अशा विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे. यामुळे शहर व परिसरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शंकरराव पुजारी यांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून नुतन बँकेची स्थापना केली होती. सन १९८६ मध्ये नुतन नागरी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला होता.
शंकरराव पुजारी यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला होता. परंतु शंकरराव पुजारी यांच्या निधनानंतर चेअरमनपदाची धुरा प्रकाश पुजारी यांनी स्विकारली. मध्यंतरीच्या काळात या बँकेतील कामकाजात आलेली शिथिलता, नियमबाह्य कामकाज आणि कर्जवाटप आदी कारणांनी बँकेला घरघर लागली होती.
१३ मे २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने नुतन बँकेच्या कामकाजावर निर्बंध लादत प्रशासकाची नेमणूक केली होती. प्रशासक नेमणूक काळातही पुन्हा एकदा बँकेचे कामकाज पूर्ववत सुरु करण्यासाठीची संधी देण्यात आली होती. त्याची मुदत १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत होती. परंतु ती मुदत संपण्यापूर्वी आणि बँकेच्या कामकाजात कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवानाच रद्द केल्याचा आदेश जारी केला आहे.