शहरातील विस्तारानंतर २०१५ मध्ये मिरज पोलिस ठाण्याची महात्मा गांधी पोलिस ठाणे ही स्वतंत्र निर्मिती झाली. या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मिरज, कृष्णाघाट परिसर ते मिरज-कोल्हापूर रोड आणि पंढरपूर रोडपर्यंतची हद्द निश्चित करण्यात आलीया पोलिस ठाण्यासाठी ८० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, सद्यःस्थितीत ६८ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ११ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत.
वर्षभरात २६८ गुन्ह्यांची नोंद येथे आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, ईदगाह मैदान, ख्वाजा वस्ती परिसरात अनेक गुन्हे घडतात, तर वैद्यकीय नगरीतील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये अयोग्य उपचारात दगावल्याच्या कारणातून वादावादी, प्रसंगी हाणामारीच्या घटना घडतात. त्यामुळे महात्मा गांधी ठाण्यांतर्गत येणाऱ्या या विस्तारित भागात गुन्हेगारी क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या येथे शहर पोलिस ठाण्याच्या तुलनेत अधिक आहे.गांजासारख्या अमली पदार्थांच्या तस्करीवर येथे अधिक कारवाई होताना दिसते. संवेदनशील म्हणून ख्वाजावस्ती, स्टेशन रोड, ईदगाह परिसर, भारतनगर, रेड लाईट एरिया ही ठिकाणे ओळखली जातात. विस्तारलेला परिसर आणि अपुरी संख्या यामुळे महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढताना दिसत आहे. गांधी पोलिस ठाण्यांतर्गत शहरात स्टेशन रोड आणि मिशन चौकात दोन पोलिस चौक्या आहेत. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी त्या कायम बंद असतात. नागरिकांना सुरक्षितता वाटावी आणि तत्काळ तक्रार नोंदवून गुन्हेगारीवर वचक बसावा, या उद्देशाने केलेली पोलिस चौकी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.नशेखोरांकडून स्टेशन रोडवरील प्रवाशांवर हल्ले करणे, पाकीटमारी, दमदाटी करून लुटणे अशा घटना घडतात. या घटनांना अटकाव करण्यासाठी येथे मागणीनंतर पोलिस चौकी उभारली आहे. ती बंद असली तरी भुरट्या चोरांनी धसका घेऊन प्रवाशांना त्रास देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बस स्थानक परिसरात मोबाईल, पर्स आणि सोनसाखळी चोरी अशा घटना वाढल्या आहेत. इथे कायम बंदोबस्त आवश्यक आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथे बंदोबस्त ठेवणे शक्य नसल्याने चोरट्यांकडून कायम हातसफाई केली जाते. शासकीय रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयांत वैद्यकीय उपचार चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे रुग्ण दगावल्यानंतर त्याचे खापर डॉक्टरांवर फोडून नातेवाइकांकडून दंगा, मारामारी अशा घटना घडल्याची नोंद ही गांधी पोलिस ठाण्यात होते. मिरज शासकीय रुग्णालयात गुन्हेगारांच्या ‘एमएलसी’साठी बंदोबस्ताकरिता पोलिसांची नेमणूक करावी लागते. शिवाय मिरजेतील सण-उत्सव पाहता बंदोबस्तासाठी कर्मचारी अपुरे पडतात. महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे स्थलांतर सोयीच्या ठिकाणी करणे आवश्यक आहे.