भयानक, आधी प्रियकर नंतर त्याच्या मित्राकडून बलात्कार, मग 13 जणांकडून लॉजवर अत्याचार
घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीडित मुलगी ओदिशाची राहणारी असून ती आंध्र प्रदेश विशाखापट्टणममध्ये घरकामाला होती. अटक केलेल्या आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. पोलीस फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.
“अल्पवयीन मुलीवर आधी तिचा प्रियकर नंतर त्याच्या मित्राने बलात्कार केला. आरके बीचवर ती मुलगी आयुष्याचा शेवट करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथे असणारे फोटोग्राफर्स तिच्याशी बोलले. तिला ओदिशाला नेऊन सोडण्यापूर्वी त्यांनी तिच्यावर अनेकदिवस बलात्कार केला. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपी वगळता सगळ्यांना अटक केली आहे” आंध्र प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार
पीडित मुलगी नऊ महिन्यापूर्वी ओदिशावरुन विशाखापट्टणमला आली होती. 17 डिसेंबरला ती बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी विशाखापट्टणममध्ये पीडित मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. 23 डिसेंबरला मुलीच्या वडिलांना ओदिशा पोलिसांकडून फोन आला. वडिलांसह पोलीस टीम ओदिशाला जाऊन पीडित मुलीला 25 डिसेंबरला विशाखापट्टणमला घेऊन आले. पीडित मुलीला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे 31 डिसेंबरला तिने आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली. 13 जणांनी वेगवेगळ्या तारखेला, वेगवेगळ्या लॉजवर तिच्यावर बलात्कार केला.
मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले
“काही प्रश्नांची उत्तर हवी होती, म्हणून पोलिसांनी पालकांना तिला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलं. पण ते आले नाहीत. त्यानंतर पोलीस मुलीच्या घरी गेले. पण ती काही बोलली नाही. 31 डिसेंबरला ती आई-वडिलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली व तिने तिच्यासोबत घडलेला प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलगी तिच्या वाढदिवशी प्रियकरासोबत गेली होती. प्रियकराचा मित्रही सोबत होता. आरके बीच जवळच्या एक लॉजमध्ये प्रियकर आणि त्याच्या मित्राने तिच्यावर जबरदस्ती केली. तिच्याशी मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी मुलीला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडलं” आंध्र प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली.
फोटोग्राफर्सकडून अत्याचार
त्यानंतर मुलगी बीचजवळ गेली. तिथे काही फोटोग्राफर्ससोबत तिची ओळख झाली. राजू, हरीश, नागेंद्र आणि गोपी अशी त्यांची नाव होती. त्यांनी तिला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतोय असं दाखवलं. हे फोटोग्राफर तिला जवळच्या लॉजवर घेऊन गेले. त्यांनी तिच्यावर अत्याचार केला असं पोलिसांनी सांगितलं. आणखी सहा आरोपींनी 22 डिसेंबरपर्यंत मुलीवर अत्याचार केले, असं पोलिसांनी सांगितलं. 23 डिसेंबरला एक आरोपीने तिच्या हातात 200 रुपये देऊन तिला ओदिशा पोलीस स्टेशनजवळ सोडलं. पोलिसांनी तिला आसरा दिला व तिच्या पालकांशी संपर्क साधला.