आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये, खासकरून महाराष्ट्रीयन जेवणाच्या ताटामध्ये भाजी, उसळ आणि डाळींना म्हणजेच उजवीकडे वाढल्या जाणाऱ्या पदार्थांना जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व ताटातील डाव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांनाही दिले जाते. चटणी, कोशिंबीर, लोणची अशा पदार्थांचा या डाव्या बाजूमध्ये समावेश केला जातो. हे पदार्थ अगदी चमचाभर जरी वाढले, तरी संपूर्ण जेवणाची चव वाढवण्याचे काम ते करत असतात.
लसूण, जवस, तीळ अशा कितीतरी पदार्थांपासून मस्त पौष्टिक आणि चटपटीत चटण्या बनवल्या जातात. आता या चटण्यांमध्ये इन्स्टाग्राम, सोशल मीडियावर @sm.katta या अकाउंटने शेअर केलेल्या सोयबीन चटणीची भर पडली आहे. अगदी मोजक्या पदार्थांचा वापर करून तयार होणाऱ्या आणि बनवायला अतिशय सोप्या असणाऱ्या या चटणीचे साहित्य आणि रेसिपी काय आहे ते पाहूया.सोयाबीन चटणी रेसिपी
साहित्य
सोयाबीन
खोबरं
लसूण
कढीपत्ता
मीठ
तेल
जिरे
काश्मिरी लाल तिखट
तांबडे तिखट
साखर
तूप
कृती
सर्वप्रथम गॅसवर एक तवा ठेवा.
त्यामध्ये वाटीभर सोयाबीन, खोबरे, ६-७ लसूण पाकळ्या, ७-८ कढीपत्त्याची पाने, एक छोटा चमचा मीठ घालून सर्व पदार्थ कोरडे भाजून घ्या.
काही मिनिटांनी यामध्ये चमचाभर तेल, जिरे, लाल आणि तांबडे तिखट चवीनुसार घालून घ्या.
सर्व पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर घालून वाटून घ्यावे.
सोयाबीनची चटणी तयार आहे. या चटणीवर तुम्ही चमचाभर तूप घालून, पोळीसोबत खाऊ शकता.