केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योेतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाचा सोमवारी गौरव केला. ‘उडान दिवसा’निमित्त वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसागुडा, ओडिशा येथे आयोजित कार्यक्रमात उडाण योजनेंतर्गत सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्या पाच विमानतळांचा सन्मान करण्यात आला. झारसागुडासह पेंगाँग (मेघालय), म्हैसूर (कर्नाटक) आणि जैसलमेर (राजस्थान) यांसह महाराष्ट्रातून कोल्हापूर विमानतळाला हा बहुमान मिळाला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या वतीने सोमवारी ‘उडान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विमान कंपन्यांनाही विविध वर्गवारीत गौरविण्यात आले. कोल्हापूर विमानतळावरील सेवा देणार्या तीनही कंपन्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. विमान प्रवाशांनी कोल्हापूरवर दाखविलेला विश्वास, पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांचे विमानतळ विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न या सर्वांचे हे फलित असल्याचे विमानतळ संचालक कमल कटारिया यांनी सांगितले. कोल्हापूरचे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विमानतळ कर्मचारी, सेवा देणार्या कंपन्या यांचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.