भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या मिश्किल आणि बेधडक विधानासाटी प्रसिद्ध आहेत. रोखठोक मते व्यक्त करत असताना कधी कधी ध चा मा होतो आणि त्यामुळे गडकरी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. आता कोल्हापुरात एका आयव्हीएफ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कोल्हापुरात मर्दांची काय कमी आहे का? असं मिश्किल भाष्य नितीन गडकरी करताना दिसत आहेत.
नितीन गडकरी हे कोल्हापुरात आयव्हीएफ सेंटरच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी मिश्किल टोलेबाजीही केली. कोल्हापूरमध्ये काय मर्द लोकांची कमी आहे का? कशाला टेस्ट ट्यूब बेबी पाहिजे…, असा सवाल नितीन गडकरी यांनी करताच एकच हशा पिकला. तसेच कोल्हापूरहून बरेच लोक अमेरिकेत गेले आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापुरातून लोक अमेरिकेत गेले आहेत. त्यांना सांगा, जागा घ्या आणि कोल्हापुरात आयटीपार्क बांधा, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी दिला आहे.
एकदम जोरात काम होईल
नितीन गडकरी यांचं हे विधान ताजं असतानाच त्यांच्या जुन्या विधानाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेचा हा व्हिडीओ आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा एक कर्तृत्वान खासदाराला संसदेत पाठवा. त्यांच्या मागे माझी ताकद, मोदींची ताकद लावू. ट्रिपल इंजिन लावू. असं लावू… असं शिलाजीत पॉवर फूल देऊ. एकदम जोरात काम होईल. विकासाचं काम होईल. सुधीर भाऊ सारख्या नेत्याला प्रचंड मताने विजयी करा. तुमची सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन गडकरी यांनी केलं.
कम्युनिस्ट बदललंय
आपला देश समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे असं सर्वांना वाटतं. आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली पाहिजे. जगाने मार्गदर्शनासाठी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, आपण विश्वगुरू झालो पाहिजे, असं आपल्या सर्वांना वाटतं. देशाचे अनेक प्रकारचे उद्धिष्ट ठेवतात. सर्वांचं उद्धिष्ट एकच असतं. पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. स्वातंत्र्यानंतर तीन पक्षाचे विचारधार होते. काँग्रेसने त्यावेळी लोकशाही आणि समाजवादाचा आधार घेऊन आर्थिक विकासाचं मॉडेल मांडलं.
समाजवादी पार्टीने डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकासाचं आर्थिक मॉडल मांडलं. त्यावेळी स्वतंत्र पार्टी होती. त्यांनी लिबरल इकॉनॉमी आणि भांडवली विकासावर आधारीत विकासाचं मॉडेल मांडलं. या 75 वर्षात तिन्ही विचाराच्या बाबत काय झालं याचा विचार पाहा. कम्युनिस्ट पार्टीचंही मॉडेल होतं. कम्युनिस्ट पार्टीच्या निमंत्रणावरून मी चीनमध्ये 15 दिवस फिरलो. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना म्हटलं तुमचा फक्त लाल झेंडा आहे. पण तुमचे विचार तुम्ही बदलून टाकले. मंगोलियन वंशाची नॉन रेसिडेन्शियल चायनीज होते त्यांनी मोठी गुंतवणूक आणली आणि शांघायमधून विकासाला सुरुवात झाली. तुमच्या कम्युनिस्ट विचारधारेचं काही दिसत नाही. फक्त लाल झेंडा आहे, असं मी त्यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, आम्ही जनतेशी बांधील आहोत. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी जे जे करायचं ते आम्ही करू. तुम्हाला तो बदल वाटत असेल तर वाटेल. पण तसं नाहीय. आम्ही आमच्या जनतेसाठी काहीही करू, असं त्यांनी सांगितलं. कम्युनिस्ट बदललंय, असं नितीन गडकरी म्हणाले.
अंत्योदयाचा विचारच तारेल
आपल्या देशातून आणि जगातून कम्युनिस्ट पक्ष संपला. रशियातूनही संपला. समाजवादी पार्टीची अवस्थाही वाईट झाली. तीही संपली. स्वतंत्र पार्टी होती, तीही संपली होती. साम्राज्यवादी आर्थिक चिंतनाच्या आधारावर लिबरल विचार करणारी ही पार्टी होती, तीही संपली. त्यामुळे 75 वर्षानंतर आपल्या मनात विचार येईल. तो म्हणजे आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर कोणतं इकॉनॉमिक्स मॉडेल घ्यावं लागेल. तर मी अभिमानाने सांगतो, पंडीत दिनदयाल यांचा अंत्योदयाचा विचारच तारणार आहे, असंही ते म्हणाले.