आरसीबीने घरच्या मैदानात दिल्ली कॅपिट्ल्सवर विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सलग 5 वा विजय ठरला आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 47 धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरसीबीच्या बॉलिंगसमोर दिल्ली 19.1 ओव्हरमध्ये 140 धावावंर फुस्स झाली. दिल्लीसाठी कॅप्टन अक्षर पटेल याने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे दिल्लीला पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा हा सलग पाचवा विजय ठरला.आरसीबीने या विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम राखलंय. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. दिल्लीची प्लेऑफची शक्यता या पराभवानंतर 0.5 टक्के इतकी आहे.
दिल्लीची विजयी आव्हानाचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात झाली. आरसीबीने दिल्लीला ठराविक अंतराने झटके दिले. आक्रमक सलामीवीर जॅक फ्रेझर मॅक ग्रुक याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो दुर्देवी ठरला. जॅक नॉन स्ट्राईक एंडवर यश दयालच्या बॉलिंगवर दुर्देवीरित्या रन आऊट झाला. तसेच आरसीबीनेही वेळोवेळी झटके दिल्याने दिल्लीला कमबॅकची संधी मिळाली नाही. कॅप्टन अक्षर पटेलने काही फटके मारत दिल्लीची विजयाची आशा कायम ठेवली. मात्र तो आऊट झाल्यानंतर फक्त औपचारिकताच बाकी राहिली.
दिल्लीसाठी अक्षर पटेल याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर जेक फ्रेझर मॅकग्रुक याने 21 आणि शाई होपने 29 धावा केल्या. रसीख दार सलाम याने 10 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. आरसीबीकडून यश दयाल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लॉकी फर्ग्यूसन याने दोघांना आऊट केलं. तर स्वप्निल सिंह, कॅमरुन ग्रीन आणि मोहम्मद सिराज या तिघांना 1-1 विकेट मिळाली.
आरसीबीची बॅटिंग
दरम्यान त्याआधी दिल्ली कॅपिट्लसने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 187 धावा ठोकल्या. आरसीबीसाठी रजत पाटीदार याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर विल जॅक्स याने 41, कॅमरुन ग्रीन 32*, विराट कोहली 27 आणि महिपाल लोमरुर याने केलेल्या 13 धावांच्या मदतीने आरसीबीला 180 पार मजल मारता आली. तर इतर फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसीख सलाम दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कॅप्टन), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.