Ajit Pawar NCP Vs BJP : नुकत्याच झालेल्या लोकसभेतील पराभवाचे हादरे महायुतीत जाणवू लागले आहे. पराभवाचे श्रेय कोण घेणार, नाही का? त्यामुळे महायुतीतील धुसफूस बाहेर येत आहे. त्यातूनच अमोल मिटकरी यांनी वेगळी चूल मांडण्याची धमकी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या भवितव्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. शिंदे सेना आणि अजितदादा गटाचा या निवडणुकीत भाजपला काहीच फायदा झाला नसल्याचा सूर आळवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्याचा अजित पवार गटाला फटका बसल्याचा पलटवार करण्यात आला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर फोडण्यावरुन महायुतीत ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
अजित पवार गटावर खापर
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली. निकालानंतर लागलीच भाजपला आरसा दाखविण्यात आला. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच महाराष्ट्रात भाजपला पराभवाचे तोंड पाहायला लागल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने त्यांना सोबत घेऊन किंमत कमी केल्याचे म्हटल्या गेले. आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी देण्यात आली आहे.