ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. वेळेवर मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांची (सीएफओ) नियुक्ती केली नाही त्यामुळे मंत्रालयाने झिरोधा कंपनीतील सर्व संचालकांना दंड ठोठावला आहे.
झिरोधा एएमसी सीएफओशिवाय काम करत होती
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 31 जुलै रोजी हा आदेश जारी केला आहे. यानुसार, झिरोधा एएमसीने कंपनी कायदा, 2013 च्या कलम 203 चे उल्लंघन केले आहे. या अंतर्गत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल असलेल्या कंपन्यांना सीएफओ पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करणे आवश्यक आहे.
पण, कंपनी सीएफओशिवाय काम करत होती. झिरोधा एएमसीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांना 4.08 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
सर्व अधिकाऱ्यांना दंड ठोठावला
याशिवाय राजन्ना भुवनेशवर 5 लाख रुपये, झिरोधा एएमसीचे सीईओ विशाल वीरेंद्र जैन यांना 3.45 लाख रुपये, कंपनी सेक्रेटरी शिखा सिंगवर 3.45 लाख रुपये, नित्या इसवरन यांना 1.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कंपनीचे सीएफओ हे पद 459 दिवसांपासून रिक्त
Zerodha AMC ने मार्च 2023 मध्ये चिंतन भट्ट यांची कंपनीचे CFO म्हणून नियुक्ती केली होती. त्यापूर्वी ते कंपनी कायद्याचे पालन करत नव्हते. या दिरंगाईमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की कंपनीचे सीएफओ पद 20 डिसेंबर 2021 ते 23 मार्च 2023 पर्यंत म्हणजेच 459 दिवस रिक्त होते. झिरोधा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दंड भरण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कंपनीचे संचालक स्वत:च्या पैशातून दंड भरतील, असे आदेशात म्हटले आहे.