सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे, चार दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेत 11 जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले होते, दरम्यान त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला सोलापुरात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेतील 21 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना डावलून, पक्षात पदे दिली जात आहेत. महेश साठे यांनी संपर्कप्रमुख यांना डावलून पदे दिली आहेत. लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे पक्षातील वरिष्ठांची मोठी दिशाभूल करत आहेत, त्यामुळे आम्ही पदाचा राजीनामा देत असल्याचं या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काय आहे नेमका आरोप?
लोकसभा संपर्क प्रमुख संजय साठे यांच्याविरोधात सोलापूर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. संजय साठे यांनी शिवाजी सावंतांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याची या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे, मात्र या तक्राराची अद्यापही एकनाथ शिंदे यांनी दखल न घेतल्यानं हे पदाधिकारी नाराज आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आणखी आकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज युवासेनेच्या तब्बल 21 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सोलापुरात एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे, मात्र दुसरीकडे शिंदे हे राज्यात उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देत आहे. आज मुंबईमध्ये आणखी एका माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आतापर्यंत तब्बल 124 माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.