गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची सातत्याने चर्चा सुरु आहे. या योजनेद्वारे 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. गेल्या 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातून पावणेदहा लाख अर्ज प्राप्त
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता एकट्या पुणे जिल्ह्यातून पावणेदहा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील 9 लाख 72 हजार 819 महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया मोहिम सध्या सुरु आहे.
कोणत्या तालुक्यातून किती अर्ज?
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून सर्वाधिक 3 लाख 54 हजार 97 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पुणे शहर 75 हजार 817, बारामती 68 हजार 622, इंदापूर 63 हजार 486, जुन्नर 59 हजार 31, शिरुर 57 हजार 287, खेड 54 हजार 802, दौंड 52 हजार 34, मावळ 46 हजार 13 अर्ज सादर झाले आहेत.
त्यापाठोपाठ आंबेगाव 39 हजार 75, पुरंदर 37 हजार 967, भोर 29 हजार 411, मुळशी 27 हजार 434 आणि वेल्हा 7 हजार 746 असे एकूण 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 85.57 टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. तर 78.78 टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
छाननी प्रक्रियेला सुरुवात
पुणे जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2 लाख 28 हजार 474 अर्ज हे ऑफलाईनरित्या प्राप्त झाले होते. त्यातील 1 लाख 89 हजार 902 अर्ज पोर्टलवर भरण्यात आले असून इतर अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. या छाननी प्रक्रियेत आतापर्यंत 7 लाख 66 हजार 392 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर 795 अर्ज नाकारण्यात आले आहेत. 65 हजार 265 अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येत आहे. त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे, तसेच उर्वरित पात्र महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.