कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करणयात आली आहे. आतापर्यंत अनेकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. अशातच देशात बूस्टर म्हणजे तिसरा डोस देणार का यावर तर्कवितर्क काढले जातायत. मात्र नागरिकांच्या मनात असलेल्या या प्रश्नांवर केंद्र सरकारने कोर्टाच्या सुनावणीदरम्यान उत्तर दिलं आहे.
केरळमधील कन्नूर या ठिकाणी राहणारे गिरीश कुमार यांनी कोर्टात याचिका केली होती. लसीचा तिसरा डोस दिला जावा यासाठी गिरीष यांच्याकडून याचिका करण्यात आली होती. या याचिकेदरम्यानच्या सुनावणीच्या वेळी तिसरा डोस दिला जाणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
केरळ उच्च न्यायालयात स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारने सांगितलं, कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर तिसरा डोस घेण्याची कोणतीही तरतूद नाहीये. त्याचप्रमाणे तिसऱ्या डोसबाबात अद्याप कोणतीही मार्गदर्शक सूचनाही नाही. त्यामुळे लसीचा तिसरा डोस देता येणार नाही.
मुख्य म्हणजे कोरोना लसीचा तिसरा डोस घेतल्यानंतर लसीच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तिसऱ्या डोसबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
अमेरिकेमध्ये तिसरा म्हणजेच बूस्टर डोसाला परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या नागरिकांना हा डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलंय. तर अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस फायदेशीर ठरू शकतो, असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.