राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत या योजनेचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे महिलांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा दावा केलाय. “शिंदे सरकार निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार”, असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला.
“लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींच्या बजेटमधील पैसे कमी केले. नगरपालिका महानगरपालिकेच्या विकास निधी वळती केले. हे सर्व पैसे राज्य सरकारने उडविले आहे. याची माहिती नगरपालिकेच्या सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांना जाऊन विचारा. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे. निवडणूक होईपर्यंत ही योजना सुरू राहील. निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिणी योजना बंद करण्यात येईल”, असा दावा अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर केला.
‘महाराष्ट्रात 50 कोटीत आमदार खरेदी केलेत, कर्नाटकात तीच किंमत 100 कोटींवर’
“आमदारांना फोडण्यासाठी भाजप सरकारने 50 – 50 कोटी रुपये दिले. मागील अडीच वर्षांपासून राज्यांमध्ये तेच राजकारण सुरू आहे. काही पक्ष फोडलेत. ईडी, सीबीआयचा धाक दिल्याने आमचे काही नेते पळालेत. महागाई वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. एका एका आमदाराला 50 – 50 कोटी रुपये दिले. 45 आमदारांचा हिशोब लावा. महाराष्ट्रात 50 कोटींचा भाव होता. तर कर्नाटकात तर हा भाव 100 कोटींवर पोहोचलेला आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्टाने कधीही पाहिलेला नाही”, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.
‘आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची लाईन लागली’
“पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी शक्यता आहे. आम्ही थर्मामीटर लावू. योग्य नेत्यांचीच पक्षात वापसी स्वीकारू. मधल्या काळात जास्त तोंड कुणी उघडलं ते तपासू”, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल केलं.
“ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यासोबत अनेक नेते, अनेक मतदारसंघातले इच्छुक लोक आज आमच्या पक्षांमध्ये येत आहेत, ज्या पद्धतीने पवारांच्या नेतृत्वाकडे पाहून आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची लाईन लागली आहे, पण हे असताना जे आम्हाला सोडून गेलेत त्याच्यातले सुद्धा काही नेते इच्छुक आहेत. पण आम्ही काही सर्व नेत्यांनाच पक्षात घेणार नाही. त्यामुळे आम्ही थर्मामीटर लावू पाहू कोण योग्य आहे, कोण नाही. कोणी मधल्या काळामध्ये जास्त तोंड उघडलेत, आमच्या पक्षातून गेल्यानंतर हे सर्व पाहून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ”, असं अनिल देशमुख म्हणाले.
‘महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही या जागा आग्रहाने मागू’
“महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नक्की येईल. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तीन जागांवर आमचा दावा राहील. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी मोरगाव या जागांवर आमचा दावा असून आघाडीच्या बैठकीत या तीनही जागा आम्ही आग्रहाने मागू. कुठल्याही पद्धतीने या जागा आम्ही सोडणार नाही. महाविकास आघाडीत वादविवाद झाला तरी चालेल. आम्ही या जागा सोडणार नाही. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे”, असं अनिल देशमुख म्हणाले.