ग्राहकांना अनेक दिवसांपासून आयफोन 16 ची प्रतिक्षा आहे. पण आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. त्यामुळे पैशांची व्यवस्था करुन ठेवा. 9 सप्टेंबर रोजी ॲप्पल कंपनी अनेक उत्पादनं बाजारात घेऊन येणार आहे. यामध्ये आयफोन 16 सीरीज पण लाँच होईल. त्यामुळे आयफोन 15 सीरीज स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे.
जेव्हा पण कंपनी नवीन उत्पादन बाजारात आणते. नवीन आयफोन बाजारात आणते, त्यावेळी जुने मॉडेल स्वस्त होते. ई-कॉमर्स कंपन्या जुन्या मॉडलवर ऑफर्स आणि डिस्काऊंट देतात. त्यामुळे आयफोन चाहत्यांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे.
ॲप्पल इव्हेंट येणार
ॲप्पल कंपनीने आगामी कार्यक्रमासंबंधी अधिकृतपणे निमंत्रण पाठवणे सुरु केले आहे. या कार्यक्रमाची टॅगलाईन ‘इट्स ग्लोटाइम’ अशी आहे. ॲप्पल आयफोन 16 सीरीज मध्ये 4 मॉडेल्स लॉन्च होतील. यामध्ये आयफोन16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अर्थात कंपनीने या कार्यक्रमात अजून इतर कोणती उत्पादनं लाँच करण्यात येतील याची माहिती दिलेली नाही.
हा इव्हेंट 9 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा 10:30 वाजता सुरु होईल. चाहते हा कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून पाहू शकतील. त्यासाठी तुम्हाला ॲप्पलच्या अधिकृत साईटवर अथवा युट्यूब चॅनलवर जावे लागेल. कंपनी वर्ष 2020 पासून एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ स्ट्रीमिंग करत आहे. यामध्ये आयफोनची नवीन सीरीज आणि इतर उत्पादनं लाँच करण्यात येणार आहे.
आयफोन 16 चे फीचर्स काय
अजून या नवीन आयफोनचे कोणतेही छायाचित्र समोर आलेले नाही. पण ॲप्पल सीरीजच्या मागील आयफोन पेक्षा त्याचे डिझाईन अधिक आकर्षक आणि त्याची कामगिरी दमदार असण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना नवीन फीचर्स, एआय सपोर्ट, जोरदार कॅमेरा आणि अद्ययावत बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणेच हा आयफोन ग्राहकांना 128G, 256GB आणि 512GB या स्टोरेजमध्ये मिळले. 9 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा 10:30 वाजता या स्मार्टफोनचे चाहत्यांना दर्शन होईल. भारतात या लोकप्रिय मोबाईलचे उत्पादन सुरु असेल तरी त्याची किंमत अद्याप कमी झालेली नसल्याची नाराजी ग्राहकांमध्ये कायम आहे.