बंगालच्या उपसागरात एकामागून एक तयार होत असलेल्या कमी दाबांच्या(districts) क्षेत्रामुळे राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर देखील वाढला आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाचे वेगवेगळे अलर्ट देण्यात आले आहेत. जवळपास सर्वच जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाच्या सरी बरसत आहेत.
पुणे आणि साताऱ्यासाठी पावसाचा (districts)ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे राज्याच्या तापमान घट झाली असून वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेत गारठा वाढला आहे.
आज मुंबईला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही भागांमध्ये ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
त्याचबरोबर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
विदर्भ आणि मराठवाडामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड येथे रिमझिम पाऊस बरसत आहे. तर, विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
देशात गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं पर्जन्यमानात वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.