भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून देणारी मनू भाकर कामय चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मनू भाकर हिने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. मनू भाकर हिने आपल्या संपूर्ण परिवारासह सचिन तेंडुलकरसह त्याची पत्नी अंंजली तेंडुलकर यांची भेट घेतली. मनू भाकरच्या भेटीनंतर सचिनने एक खास पोस्ट केली आहे.
मनू भाकर ही कौन बनेगा करोडपती या शोमध्ये दिसणार आहे. यासाठी मुंबईमध्ये आली आहे. मुंबईमध्ये आल्यावर तिने सचिनची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मनू भाकर म्हणाली होती की, जर मला सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली सरांसोबत एक तासही घालवायला मिळाला तर माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. मनूची यामधील सचिनला भेटण्याची इच्छा तर पूर्ण झाली आहे. सचिनसोबतच्या भेटीनंतर तिने फोटो सोशल मीडियालवर शेअर केले आहेत.
द वन अँड ओनली सचिन सर, हा क्षण शेअर करताना मला खूप अभिमान वाटतो. तुमचा प्रवास आम्हाला आमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमीच प्रेरित केलं आहे. अविस्मरणीय क्षणांसाठी धन्यवाद सर, अशी पोस्ट मनू भाकर हिने केली आहे. मनूची ही पोस्ट व्हायरल होत आहे. मनूच्या पोस्टवर सचिनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनू तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भेट माझ्यासाठी खूप खास होती. तु मिळवलेले यश पाहून अनेक मुली प्रेरणा घेत आहेत. अशीच पुढे जात राहा आणि तुझ्या लक्ष्याचा पाठलाग करत नवीन बेंचमार्क सेट कर, असं सचिन तेंडुलकर याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला मनू भाकर हिने पहिले पदक जिंकून दिले होते. नेमबाजीमध्ये वैयक्तिक स्पर्धेत एक आणि दुसरे पदक मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. मनू भाकर अशी कामगिरी करणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.