येथील माहेरवासीन व कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार यांचा दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून वैष्णवी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैष्णवी या कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या टेबलटेनिसपटू आहेत. त्यांनी यापूर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने त्यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले.