लेबनान आणि सीरिया 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता हादरले. एकामागे एक साखळी स्फोट या देशांमध्ये सुरु झाले. कधी कोणी विचारही केला नव्हता अशा पेजरच्या माध्यमातून हे साखळी स्फोट झाले. हिजबुल्लाहचे दहशतवादी असलेल्या पेजरमध्येच हे स्फोट झाले. जवळपास पाच हजार स्फोट झाले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला तर 4000 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईराणचे राजदूत मोज्ताबा अमिनी या हल्ल्यात जखमी झाले. त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. या हल्ल्याचा आरोप इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर लावला जात आहे.
अद्याप कोणीही घेतली नाही जबाबदारी
लेबनान आणि सिरियामध्ये झालेले पेजर स्फोट कसे झाले? कोणी केले? याची अधिकृतरित्या कोणीही जबाबदारी घेतली नाही. परंतु आरोप इस्त्रायलवर होत आहे. हे पेजर तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने बनवले असल्याचे म्हटले जाते. परंतु कंपनीकडून नकार दिला जात आहे. हिजबुल्लाह आधुनिक मोबाईल ऐवजी जुने तंत्रज्ञान असलेले पेजर वापरत होती. कारण हिजबुल्लाहच्या अतिरेक्याचा ट्रेस लागू नये? हॅकींग होऊ नये. भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का?
भारताने यासाठीच 5G तंत्रज्ञानामध्ये चीनला येऊ दिले नाही
भारताने यापूर्वीच असे हल्ले रोखण्याची मजबूत व्यवस्था केली आहे. भारत सरकारचे नेहमी पब्लिक कम्युनिकेशन हार्डवेअरवर बारीक लक्ष असते. त्यासाठीच भारताने 5G तंत्रज्ञानामध्ये चीनसारख्या देशांची घुसखोरी होऊ दिली नाही. म्हणजे या क्षेत्रात चीनचे तंत्रज्ञान भारतात येऊ दिले नाही. विदेशी तंत्रज्ञानाचा वापर देशात होऊ नये, हे गरजेचे आहे. विशेषत: शत्रू राष्ट्राचे तंत्रज्ञान देशात येऊ नये, याची काळजी भारताकडून घेतली जाते.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, भारत स्वत:च आपले 5जी तंत्रज्ञान विकसित करत आहे. ते तंत्रज्ञान अतिशय प्रगत असणार आहे. दीर्घकाळ देशाच्या सुरक्षेसाठी हे फायदेशीर असणार आहे. विदेशातून येणाऱ्या तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर भारत बंद करणार आहे. जसे सीसीटीव्ही कॅमेरे चीनमधूनच येत असतात. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येते.