कुणी बंड केल्यास त्याला थंड करण्यासाठी 4 दिवस, प्रचारासाठी जादा वेळ; निवडणुकीच्या तारखांसबंधी इंटरेस्टिंग गोष्टी
निवडणूक कधी होणार, कधी होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालंय. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या, महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्राचे नवीन कारभारी कोण हेसुद्धा ठरणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरला सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच, अर्ज भरण्यासाठी आजपासून फक्त 14 दिवस उरले आहेत. त्यामध्येही तारखा आणि सुट्ट्यांचा विचार करता दिवस कमी मिळतात. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची धावपळ होणार हे नक्की. दरम्यान, 30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
निवडणुकीच्या तारखांसबंधी काही इंटरेस्टिंग गोष्टी
– महाराष्ट्रात मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.
– 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल.
– म्हणजेच, 15 व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी 23 नोव्हेंबरला ठरणार.
– या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर अशी आहे.
– 26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ असेल.
– याचाच अर्थ अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे 14 दिवस.
– तसेच, छाननी 30 ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असेल.
– याचाच अर्थ, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ असणार.
– एकूणच, उमेदवारांना यावेळी प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
– 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे प्रचारासाठी जवळपास एक महिना मिळणार आहे.
– आजपासून 39 दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार.
– अर्जांची छाननी ते माघारीत 4 दिवसांचा वेळ.
– कुणी बंड केल्यास, त्याला समजवण्यासाठी 4 दिवसांचा वेळ मिळणार.
असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक –
निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024